
0 Bookmarks 149 Reads0 Likes
भेट तुझीमाझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
No posts
No posts
No posts
No posts
Comments