
0 Bookmarks 1438 Reads0 Likes
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी
सैनिक हो तुमच्यासाठी
आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुन या इकडे, वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रूंची, डोळयांत होतसे दाटी
सैनिक हो तुमच्यासाठी
उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्री
माऊली नीज फिरिवते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येऊनी चिंता काळजा दुखविते देठी
सैनिक हो तुमच्यासाठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी
No posts
No posts
No posts
No posts
Comments